# पूर्वइतिहास_गुरव समाज
# देवी-शिव पूजकांचा उदय
हिंदू धर्मामध्ये देवतांवरून दोन पंथ निर्माण झालेले आहेत. शिव देवताला मानणारे, त्याच्यावर गाढ श्रद्धा असणारे ‘शैव’. तर विष्णू देवताला भजणारे ‘वैष्णव’…
नारद भक्तीसूत्र या ग्रंथामधील नोंदीनुसार शैव पंथामध्ये दुर्वास, विश्वमित्र, चतुरावनन, मार्कण्डेय, बनासुर, कार्तिकेय, दधिची, कण्व, भार्गव, बृहस्पती, गौतम आदी थोर ऋषी मुनी होऊन गेलेले आहेत.
या पैकी ‘दधिची’ ऋषी व त्यांच्या वंशजांना देवी- शिव पूजनाविषयी जे अधिकार प्रधान केलेले आहेत. त्याचा उहापोह शिवपुराणा अंतर्गत ज्ञान संहितेत 44 व्या अध्यायात आहे. याचा तपशील खालीलप्रमाणे:
// ऋषयउचु://श्लोक // देवल: कश्चय: प्रोक्त
किंकार्यं तस्य विद्यते //
// सूत उवाच // दधीचिर्नाम विप्रोवैधर्मीष्ठयम्
वेदपारग: //1//
याचा अर्थ — ऋषी म्हणाले की, देवलक कोण आहेत व त्याचे काय कर्म आहे सांगा. तेव्हा सूत म्हणतात की, एक दधिची नावाचे फार धार्मिक वेदपाठी ब्राह्मण होते.
// शिवभक्ती रतोनित्यं शिवशास्त्र परायण://
यज्ञादिकर्म कर्ताचनित्य नैमित्य कारक: //2//
तस्यपुत्र तथा ह्यासी नन्मासुदर्शन: स्मृत: //
तस्य भार्याच दुष्कुलानाम्ना दुष्ट कुलोभ्दना //3//
तद्वशेसच भर्तासी तस्या : पुत्र चतुर्ष्टयम् //
सोपीनिसंशिववस्यै व पूजाचैवकरोत्यसॊ //4//
याचा अर्थ– ते शिवभक्तीत तत्पर, शिव शास्त्राचे ज्ञाते व यज्ञ आणि नित्य नैमित्तिक कर्म करणारे होते. त्यांना सुदर्शन नामक पुत्र होता. त्या सुदर्शनाच्या पत्नीचे नांव दुष्कुला होते. कारण तिच्या पितृकुलातील ब्राह्मण पार क्रूर व तामसी होते. म्हणून तिला दुष्कुला असे नाव पडले. परंतु ती सुशील होती. सुदर्शनाचे तिच्यावर फार प्रेम होते. तिजपासून सुदर्शनास चार पुत्र झाले. सुदर्शन व त्याचे पुत्र दधिची प्रमाणेच वेद पारंगत व शिवभक्तीत तत्पर होते.
दधिची स्तुयथापूर्व मृषयो- ब्राह्मण: सुत: //
तथाच शिव पूजायां नित्य कर्म परायण: //5//
यथा कर्म प्रवक्ताच तथा कर्ताच कारक: //
एवं जाते तदाकालतेस्यैव ऋषीसतमा: //6//
विपरीतं तदातस्यदैवाच्चैवा डभवतदा //
यज्जात श्रृतयां श्रेष्ठा: कथ्यमियथा श्रृतम //7//
याचा अर्थ– पूर्वी सांगितल्याप्रमाणे शिव पूजेत व नित्य कर्मात तत्पर असणारे दधिची ऋषी हे ब्रम्हदेवाचे पुत्र होते. ते जसे कर्मनिष्ठ होते तसेच दुसऱ्याकडून तसे कर्म करवीत होते. ‘सुत’ म्हणतात , ऋषीश्रेष्ठहो! अशा कार्यात त्यांचा पुष्कळसा वेळ व्यथित झाला. त्याचवेळी दैवयोगाने त्यांच्याकडून देवकार्यात काही विपरीत घडले. हे श्रेष्ठ हो ! जे काही झाले ते मी तुम्हास सांगतो. तुम्ही ते श्रवण करा.
दधिची काही कामानिमित्य गावाला गेले होते. तेथे ज्ञातीमधील लोकांनी त्यांचा यथायोग्य सन्मान केला नाही. याचे कारण काय घडले ते ऐका, ज्या वेळी दधिची गावाला गेले होते, तेंव्हा त्यांच्या सुदर्शन पुत्राला शिवभक्तीत तत्पर राहण्याविषयी सांगितले होते व त्याच्या आदेशाप्रमाणे सुदर्शनदेखील शिवभक्तीत तत्पर होता. शिवपूजन करीत असताना शिवरात्र आली. त्यावेळी सुदर्शनाने सुद्धा व्रत व उपवास केला. सुदर्शनाने ही शिवपूजा केली. परंतु वाईट गोष्ट अशी घडली की, त्या रात्री सुदर्शनाने स्त्रीसंग करून स्नान न करता प्रात:काळी मंदिरात येऊन शिवपूजा करू लागला. याला एक क्षण जात नाही तोच तो जडत्वास प्राप्त झाला. कारण ज्या वेळेस तो शिवपूजा करू लागला तेंव्हा शिवास क्रोध येऊन शिव म्हणू लागले की, ‘दुष्टा शिवरात्रीचे दिवशी तू स्त्रियांचा संग केलास व पुन: स्नान न करता पूजा करू लागलास’. हा अपराध तू जाणून बुजून केलास, त्यामुळे तू जडास प्राप्त हो असा शाप दिला. आणि दूरवरून स्पर्श कर. मला स्पर्श करू नको, असे म्हणू लागले. याप्रमाणे शंकराने शाप दिल्या बरोबरच तो लगेचच जडत्वास प्राप्त झाला. ही गोष्ट, ग्रामस्थाच्या ब्राह्मण लोकांस समजली होती. म्हणून त्यांनी दधिची सन्मान केला नाही. परंतु जेंव्हा दधिची आपल्या गावात परत आले तेव्हा त्यांना हा सर्व वृत्तांत समजला आणि शिवाने देखील तुझ्या पुत्राने असे कृत्य केले म्हणून दधिची निर्भत्सना केली. तेव्हा दधिची फार दुःखी झाले आणि पुत्राने कुळ नष्ट केले म्हणून शोक करू लागले.
सुदर्शनाची पत्नी मात्र पतीची दुरावस्था पाहून विव्हळ झाली. पतीव्रत दुष्कुलाचा पतीव्यथान्वये मरण पावली. तथापी शिवास संतुष्ट करून शिवाचा अनुग्रह व्हावा या करीता शिवाची पूजा दधिची ऋषी करू लागले. पुढे दधिची ऋषी आपल्या पुत्रास सचेष्टता प्राप्त व्हावी व कुळाचा उद्धार व्हावा, या करीता पार्वती देवीची आराधना करू लागले. तेव्हा देवीने प्रसन्न होऊन देवीने सुदर्शन पुत्रास सचेत केले व त्याचा स्वीकार केला. त्यानंतर सुदर्शन देखील स्वतःदेवीची पूजा करू लागला. चंडी पूजनाने पार्वतीस प्रसन्न केले व त्याचा स्वीकार केला. नंतर सुदर्शन देखील स्वतःदेवीची पूजा करू लागला.
आपल्या सुदर्शन पुत्रावर शिवाचा कृपाप्रसाद व्हावा या करिता स्वतः पार्वतीदेवी शिवास वारंवार प्रसन्न करू लागली. याप्रमाणे शिवास प्रसन्न करून त्यास नमस्कार केला आणि पुत्रास आपल्या उत्संगी घेऊन स्वतः देवीने त्यास धृतस्नान करविले आणि ग्रंथीतून तीन तंतूनीयुक्त असे यज्ञपवित देऊन तीस अक्षरांनी युक्त अशा शिवगायत्रीचा उपदेश केला..श्री शब्दाने युक्त असा शिव षडाक्षर मंत्र म्हणजे ओम श्री नमः शिवाय या मंत्रांचा षोडशवार जप करून संकल्पपूर्वक या ब्रह्मचार्यानी पूजा करावी. समंत्रक म्हणजे वेदमंत्रांसह स्नानापासून नमस्कारापर्यंत पूजा करावी. पूजेच्यावेळी वाद्य असावेत. ऋषीलोक असावेत अशी देवीने आज्ञा दिली व याप्रमाणे सुदर्शनाच्या हाताने शिवपूजन करून स्वतः देवीने सुदर्शनास शिव सहस्त्र नामादि, अनेक प्रकारचे मंत्र, वेदमंत्र देवीने शिकवले आणि असा वर दिला की, जे काही यत्किंचितही शिवाच्या निमित्याने आहे, ते तुमच्या निमित्याने आहे आणि म्हणून त्यास तुम्हास ग्रहण करण्याचा अधिकार आहे. धान्य, फल, वृक्ष, तूप आदि काहीही असो ते तुम्ही ग्रहण करा. तुम्हास दोष नाही.
शिव वर देतात कि, माझ्या कृत्यांत तुम्ही मुख्य आहात व माझ्याप्रमाणे पार्वतीच्याही कृत्यांत तुम्ही मुख्य आहात. जर प्रजापत्य यज्ञ झाला तर त्यात तुम्हा माझ्या स्थापित ब्राह्मणांपैकी निदान एक तरी ब्राह्मण अवश्य असला पाहिजे. तुमच्या पूजनाने प्रजापत्य यज्ञाचे फल होईल. देवी- शिव संबंधित कृत्यात व प्रजापत्य यज्ञात जे कोणी तुम्हास बोलवणार नाही व तुमचे पूजन करणार नाही. तर त्यांनी केलेली सर्व कर्म निष्फळ होतील. आणि कोणीही पूजा केली तर तुम्ही जेंव्हा ‘अस्तु’ असे म्हणाल तेंव्हाच शिवाची पूजा पूर्ण होईल. महात्मा सुदर्शनाचे जे चार बटुक होते .त्यांची अभिशक्तिपूर्वक चारही दिशेने शिवाने स्थापना केली आणि आज्ञा दिली कि तुम्ही त्रिपुंड तिरुक धारण करावा. सदैव स्नान करावे, शिवसंध्या व शिव गायत्रीचा जप करावा. प्रथम माझी सेवा करून तुमच्या पुजाऱ्याच्या कुलास योग्य असेल ते कार्य करावे. एक मंत्र सोडून सर्व मंत्र वाचावे. या प्रकारे त्या बटूस अधिकार देऊन शिव व पार्वतीस सुदर्शन पुत्रास स्थापित केले व अनेक वर देऊन पाठवले. दोन्ही सेनेमध्ये ज्या भागास माझा बटू किंवा ब्राह्मण राहील तिकडे नित्य विजय होईल यात संदेह नाही. आणि जे कोणी त्यांची पूजा करतील ती माझीच पूजा होईल. याप्रमाणे वेद्ब्रह्म म्हणजे एका ब्राह्यगायत्रीस सोडून त्यांना वर दिले.
शिव म्हणतात , तुमचे जे कर्तव्य आहे ते सदैव करावे. शिव व पार्वतीने त्यांना स्थापित केले म्हणून त्यांना ‘बटू’ किंवा ‘शिवद्विज’ अशी संज्ञा झाली त्याचप्रमाणे त्यांना शिवगायत्रीचे ब्रम्हचर्य दिले म्हणून त्यांना ब्राह्मण अशी संज्ञा झाली. त्यांनी घोर तप करून शिवपार्वतीस प्रसन्न केले व अनेक वर मिळवले म्हणून तपोधन अशी संज्ञा झाली. गुजरात प्रांतात हे शिवद्विज असून तपोधन ब्राह्मण प्रसिद्ध आहे. प्रथम त्यांची पूजा केली केली नाही तोपर्यंत इतरांना पूजा करण्याचा अधिकार नाही, असे साक्षात शिववचन आहे. शिव म्हणतात, माझे स्थापित ब्राह्मण सदैव पूजनास योग्य आहे. ज्या ज्या ठिकाणी त्याची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी ते अवश्य असले पाहिजे. प्रजापत्य यज्ञात व भोजनात एक ‘शिव ब्राह्मण’ अधिक फलदायी आहे. एका शिवद्विजच्या पूजनाने प्रजापत्य यज्ञाचे पुण्य होते व एका शिवद्विजास भोजन समर्पण केल्यास प्रजापत्य ब्राह्मण भोजनाचे पुण्य मिळते. दहा ब्राह्मणाच्या भोजनास प्रजापत्य भोज म्हणातात. म्हणून शिव पूजनादि कार्यात त्यांची विशेष प्रधानता आहे.
अश्या पद्धतीने देवी शिव पूजकाची स्थापना करून स्वतः शिव व पार्वतीने विशेष वर व अधिकार देऊन केली. वंश परंपरेने मिळालेल्या या अधिकारांन्वये अनेक लहान मोठ्या गावांत, शहरात, तीर्थाच्या ठिकाणी पुजारी देवी व शिवाच्या पूजेच्या सेवेमध्ये कार्यमग्न आहेत.
शब्दांकन- आप्पासाहेब म. मुळजे